मंत्रालयातही ओमिक्रॉनचा शिरकाव; दोन पोलीस आणि एक कर्मचारी बाधित!

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच राज्यातील ओमियक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातच आता राज्याच्या मंत्रालयात देखील ओमिक्रॉन बाधित सापडल्याचं समोर आळं आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून या बाधितांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीत संबंधित तीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि एक क्लार्क असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे. हे तिघे करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यापैकी दोन जण विलगीकरण कक्षात तर एक व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये होती.

दरम्यान, त्यांचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवल्यानंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात हलवण्यात आल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं.

तिघांनाही लक्षणं नाहीत
ओमिक्रॉनची लागण झालेले मंत्रालयातील तिन्ही कर्मचारी हे असिम्प्टोमॅटिक अर्थात कोणतीही लक्षणं नसणारे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेसाठी ही काहीशी दिलासादायक बाब ठरली आहे. दरम्यान, या तिघांच्या कुटुंबीयांची देखील आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचं अश्विनी पाटील यांनी सांगितलं.

आज मुंबईत ४ हजार करोनाबाधित!

दरम्यान, आज दिवसभरात मुंबई शहरात सुमारे ४ हजार करोना बाधित आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ८.४८ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता असून मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*