कोव्हिड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला होणार दंड
रत्नागिरी : शासनाकडील 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाचा भंग झाल्यास किंवा केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शर्तभंग प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याकामी व दंड आकारण्यासाठी, दंड वुसलीसाठी, यंत्रणा व अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी डॉ.बी.एन. पाटील यांनी प्राधिकृत केले आहे.
कोव्हिड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी रक्कम रु. 500/- दंड भरावा लागणार असून पोलीस प्रशासन/स्थानिक नगरपंचायत-नगपरिषद/स्थानिक ग्रामपंचायतींना दंड वसूलीसाठी प्राधिकृत केलेले आहे.
ज्या संस्था किंवा आस्थापना यांनी आपले अभ्यागत, ग्राहक यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे अपेक्षित आहे. उदा. शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, दुकाने मॉल, चित्रपटगृहे, नाटयगृहे, गार्डन, पार्क, वस्तूसंग्रहालये, पर्यटन स्थळे, हॉटेल, भाजीपाला विक्रेते, रस्त्यावरील स्टॉल, टपऱ्या इत्यादी यांच्या परिसरात(जागेत) एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर अशा संस्थांना किंवा आस्थापनांना रु.10 हजार इतका दंड करण्यात येणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन/स्थानिक नगरपंचायत-नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन यांना प्राधिकृत केलेले आहे.
एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत:च कोव्हिड अनुरुप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर प्रत्येक प्रसंगी 50 हजार इतका दंड करण्यात येणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन/स्थानिक नगरपंचायत-नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन यांना प्राधिकृत केलेले आहे.
कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरुप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना रु. 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनीस किंवा वाहक यांनी कोव्हिड अनुरुप वर्तनात कसूर केली तर त्यांना 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. तसेच बसेसच्या बाबतीत मालक, परिवहन एजन्सीज कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी रु. 10 हजार इतका दंड करण्यात येईल. दंड वसुलीसाठी पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व संबधित यंत्रणा, विभागीय नियंत्रक व संबधित यंत्रणा (रा.प. विभाग), स्थानिक नगरपंचायत-नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत यांनी प्राधिकृत केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाकडील 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशास अधीन राहून वरील ज्या यंत्रणेला /अधिकारी यांना दंड वसूल करण्यास या आदेशान्वये सक्षम अधिकारी म्हणून नेमले आहे. त्याकरिता संबधित यंत्रणांनी स्वतंत्र्यरित्या नवीन बँक खाते काढावे किंवा या कारणासाठी यापूर्वीच बँक खाते काढले असल्यास नवीन खाते काढण्याची आवश्यकता नाही. या खात्यावर दंडाची रक्कम जमा करावी. तसेच दंडाची संपूर्ण जमा रक्कम ही District Disaster Response Fund, State Bank of Inia, A/C No. ३८२६३४१६९८४, IFSC Code – SBIN0000४६२ या जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी (सर्वसाधारण शाखा) यांच्याकडील खात्यावर जमा करावयाची आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.