रत्नागिरीत अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्षमीकरणावर भर

रत्नागिरी : शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींनाही समान संधी आणि हक्क मिळाले पाहिजेत, ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. रत्नागिरी येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण आणि फीत कापून झाले.

यावेळी आमदार किरण सामंत, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, प्राचार्य पी. के. देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक मुलींसाठी हे वस्तीगृह पुढील आठ दिवसांत कार्यान्वित व्हावे. हे वस्तीगृह केवळ मुलींसाठीच वापरले जावे, याची खबरदारी घेतली जाईल.”

त्यांनी पुढे सांगितले की, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक वस्तीगृह असलेला मतदारसंघ आहे. मागील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना साडेपाचशे कोटी रुपये खर्चून इमारत बांधण्यात येत आहे, ज्यामध्ये वस्तीगृहाचाही समावेश आहे. या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना शासनाच्या निधीतून निवासाची सोय उपलब्ध करून देण्याची संकल्पना राबवली जात आहे.

डॉ. सामंत यांनी स्पर्धा परीक्षांमधील रत्नागिरी जिल्ह्याच्या वाढत्या यशाचा उल्लेख केला. “गेल्या तीन वर्षांत यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्रांतून अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा डॉक्टर, अभियंता झाल्यावर जबाबदारी संपत नाही. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या परीक्षांमधून यश मिळवणारे विद्यार्थी आज महाराष्ट्रात दिसत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

सोफिया कुरेशी यांच्या उदाहरणाचा दाखला देताना ते म्हणाले, “भारताच्या संरक्षण क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या सोफिया कुरेशी यांनी फायटर प्लेन चालवून जगाला आपली क्षमता दाखवली आहे. अशा अनेक सोफिया कुरेशी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासारखे नेतृत्व निर्माण व्हावे, यासाठी गावागावांत अशी वस्तीगृहे उभी राहणे गरजेचे आहे.” भविष्यात या वस्तीगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलींपैकी किमान एक तरी सोफिया कुरेशी किंवा राष्ट्रपती मुर्मू यांच्यासारखे नेतृत्व निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वस्तीगृहाच्या या उपक्रमामुळे अल्पसंख्याक मुलींना शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*