रत्नागिरी दि.12:- राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

आज शासकीय विश्रामगृह येथे राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जिल्ह्याला व कोकणाला मिळालेल्या निधीबद्दल माहिती दिली.

जेट बोट ही देशातील पहिली संकल्पना रत्नागिरी ते गणपतीपुळे या सागरी मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. या बोटीद्वारे रत्नागिरी ते गणपतीपुळे हा प्रवास समुद्रमार्गे 24 मिनीटात करता येणार आहे.

रत्नागिरी विमानतळाच्या इमारत व भूसंपादनांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजना निधीमध्ये वाढ करण्यात आली असून आता 50 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

मिऱ्या बंधारा सुशोभिकरणासाठी 41 कोटी रुपये, लोकमान्य टिळक स्वतंत्र अध्यासन केंद्रासाठी निधी 2 कोटी रुपये, जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी 160 कोटी, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 20 कोटी, जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांना फायर फायटिंग सुविधेसाठी 9 कोटी रुपये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 46 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्रासाठी 12 कोटी, क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कोकणातील उत्कृष्ट क्रीडा संकुल रत्नागिरी येथे उभारण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरणासाठी 1.5 कोटी रुपये, तारांगणाच्या येथे सायन्स सेंटर उभारण्यासाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व दापोली तालुक्यातील पालगड येथील साने गुरुजी विद्यालय या शाळांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकरिता 50 कोटी रुपये निधी, रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी 58 कोटी रुपये, रत्नागिरी शहरातील मांडवी परिसरातील गटार बांधण्यासाठी 1.5 कोटी, शिवाजी स्टेडिअम डागडुजीसाठी 2 कोटी रुपये, शिवसृष्टीसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

कोकणातील पहिल्या म्युझिकल गार्डनसाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये नवीन 500 लोकांची आसनक्षमता असलेले नाट्यगृह उभारण्यासाठी 7.5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अंदाजे 600 कोटी रुपये निधीची तरतूद जलसंपदा विभागासाठी करण्यात आली असून खारलँड बंधारे/जलसंपदा बंधारे/सागरी महामार्ग भूसंपादन आदी विकासकामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.

कोकणातील पाच जिल्ह्यांना समुद्रलगतची पूरपरिस्थिती नियंत्रण व पूरपरिस्थिती निवारा व्यवस्थेसाठी 3 हजार 200 कोटी रुपयांची देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अशाच प्रकारे मोठे सहकार्य मिळत राहील, असा विश्वासही श्री.सामंत यांनी व्यक्त केला.