मुंबई – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. पण यादरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. राज्यात २४ तासांत रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. काल, गुरुवारी राज्यातील रिकव्हरी रेट ९६.५९ टक्के होता, आज मात्र ९६.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ६ हजार ६०० नव्या रुग्णांची वाढ होऊन २३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६२ लाख ९६ हजार ७५६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार ५६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज ७ हजार ४३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६० लाख ८३ हजार ३१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ७७ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७७ लाख ६० हजार ८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ९६ हजार ७५६ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७९ हजार ५५३ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर ३ हजार २८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.