रत्नागिरी : अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेड ला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. पूर, दरडी कोसळल्यामुळे ३५ जणांचा बळी गेला. गेले वीस दिवस जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. २१ जुलैपासून त्याचा जोर वाढला. चिपळूण, खेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड शहरात घुसले. तर वाशिष्ठीच्या पुराने चिपळूणमध्ये दाणादाण उडवून दिली. पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी शहरात घुसले. इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याची उंची होती. छोट्या पान टपऱ्या, दुकाने, कौलारू घरे, अपार्टमेंटच्या तळमजल्यामध्ये वेगाने पाणी घुसले. वेगाने येणाऱ्या पाण्यापुढे कुणाचे काहीच चालले नाही. वेळ कमी मिळाल्याने व्यापाऱ्यांना माल सुरक्षित हलवण्यास वेळ मिळाला नाही. कपड्याच्या दुकानात पाणी शिरून पूर्णतः साहित्य खराब झाले होते. कोरोनाचा जोर ओसरू लागल्यामुळे अनेक दुकानदारांनी लाखो रुपयांच्या मालाची खरेदी करून दुकानात ठेवला होता. दोन दिवसाच्या पुरात त्याचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांचेच सुमारे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. घरातील भांड्यांपासून इलेक्ट्रीक साहित्यापर्यंत सर्वच मालमत्ता वाहून गेली आहे. सगळे संसार नव्याने सुरू करण्यावेळी या लोकांवर आलेली आहे. पूर ओसरल्यानंतर चार दिवसांनी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार चिपळूणमध्ये १८ हजार २७८ मालमत्ता असून खेडात १ हजार ९४० मालमत्ताचे नुकसान झालेले आहे. पूर, दरडींमुळे दोन्ही तालुक्यातील ३५ जणांचा बळी घेतला आहे. त्यात पुराचा वेढा पडल्यामुळे कोविड उपचार घेत असलेल्या दहाजणांचा समावेश आहे. खेड, पोसरे येथे दरड कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला.