पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू; अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी – जिल्ह्यातील सुशिक्षीत व बेरोजगारांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. आता या जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून ४ ते १८ डिसेंबर या कालवधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालकांनी डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन याबाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे. त्याचबरोबर गुगल प्ले स्टेअरवरून AH-MAHABMS हे मोबाईल ॲप डाऊनलोड करता येईल. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धतीचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या योजनांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारले जाणार आहेत. अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:चा मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने योजनेंतर्गत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

योजनेबाबत अधिक माहिती १९६२ अथवा १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*