गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापर यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या कडक कारवाईच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक १४ मार्च २०२६ रोजी गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

यावेळी गुहागर ते शृंगारतळी जाणारे रोडवर मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या प्रवास करणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (राहणार वेलदूर, तालुका गुहागर) याला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा आणि आठ जिवंत काडतुसे असा घातक शस्त्रसाठा मिळून आला.

पोलिसांनी या शस्त्रांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी संजय फनगुसकर याच्याविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ (२५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*