भाजप आमदार नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरुन आणि शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षनेतृत्वानं आदेश दिला तर कोणासोबतही खांद्याला खांदा लावून काम करु असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. राणेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासासाठी कोणासोबतही काम करण्या तयार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सागर रत्न मत्स्य बाजारपेठेचा सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे नेते दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत एकाच मंचावर उपस्थित होते. शिवसेना नेत्यांची उपस्थिती असताना युतीवरुन भाष्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नितेश राणे म्हणाले की, राजभरात युतीची चर्चा होत आहे. हल्ली ऐकलेली युतीची चर्चा बंद झाली होती परंतु हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीची चर्चा करणारे असंख्य कार्यकर्ते सुखावले असतील आणि चांगल्या जोमाने झोपतील अशी प्रतिक्रिया कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना नितेश राणे यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपचा कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे सिंधुदुर्ग, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र येण्याची वेळ आली तर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा युतीची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेच्या विरोधात टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली असल्याच्या चर्चा त्यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या आहेत. भाजप- शिवसेना एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.