रत्नागिरी:- पत्नीच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला 4 लाख 50 हजार रुपयांचा टिप्पर (डंपर) आपल्या नावे हस्तांतरीत केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2018 ते 2019 या कालावधीत घडली आहे.
उदय गोपाळ नागले (46, रा. चरवेली, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नी उत्कर्षा उदय नागले (44, रा. चरवेली, रत्नागिरी) यांनी गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, उदयने वाहन हस्तांतर कागपत्रांवर पत्नी उत्कर्षाच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला डंपर (एमएच-08-डब्ल्यू- 8388) आपल्या नावे करुन घेत पत्नीची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.