फोंडा, गोवा येथे धक्कादायक घटना
रत्नागिरी.: रत्नागिरीतील एका पाच वर्षीय मुलीचा गोवा कसलये तिस्क फोंडा येथे नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरा अन्वारी असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कसल्ये येथील एका महिलेचा विवाह रत्नागिरीतील एका तरुणासोबत झाला होता.
या महिलेला दोन मुले आहेत. मात्र, पतीकडून मारहाण होत असल्याने ती 2024 मध्ये आपल्या मुलांना घेऊन फोंडा येथे राहण्यास गेली.
तिथे अन्वारी यांच्या शेजारी अलाट नावाचे परप्रांतीय कुटुंब राहत होते. लग्नाला 20 वर्षे होऊनही त्यांना मूलबाळ नव्हते.
त्यामुळे ते निराश होते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि मूल व्हावे यासाठी त्यांनी एका मांत्रिकाकडे धाव घेतली होती.
मांत्रिकाने त्यांना नरबळी देण्याचा सल्ला दिला.
अन्वारी कुटुंब शेजारी राहत असल्याने आणि त्यांच्याशी चांगले संबंध असल्याने अलाट दाम्पत्याने अमेराचा बळी देण्याचे ठरवले.
3 मार्च रोजी अमेरा बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने फोंडा पोलिसांत दाखल केली. पोलीस तिचा शोध घेत होते.
शेजाऱ्यांची चौकशी केली असता, पप्पू गोंधळलेला दिसला.
पोलिसांनी गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरून अमेराचा नरबळी देऊन तिच्या घराशेजारीच मृतदेह गाडल्याचे कबूल केले.
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.