रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तर जिल्ह्यातील 19 गावांमधील वाद सामोपचाराने मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या सुचनेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी गावातील वाद मिटविले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. कोकणातील पारंपारिक सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवासाठी कामानिमित्त गावाबाहेर राहणारे चाकरमानी मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातून जिल्ह्यात दाखल होतात. यावेळी पारंपारिक वाद उफाळून येतात. मानपानावरून होणाऱ्या वादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत येऊन पोहोचते. हे टाळण्यासाठी जिल्हा पोलीस दल शिमगोत्सवापूवपासून प्रयत्नशील असते.
सुरू असलेल्या शिमगोत्सवापूव 21 गावांमध्ये देवस्थान, पालखीवरून वाद होते. केळवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) येथील पारंपारिक वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी वारंवार गावभेट, बैठका घेतल्या. परंतु दोन्हीही बाजुंकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे कोणताही यशस्वी तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
तर उर्वरित 19 गावांमध्ये मध्यस्थी वाद मिटवण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. दोन्ही गटातील नागरिकांनी एकोप्याने सण साजरा करण्याचा शब्द जिल्हा पोलिसांना दिला आहे. त्यामध्ये देवरूखमध्ये दख्खन, निवधे, ओझरेखुर्द, निवेखुर्द, सोनारवाडी, साडवली, राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण, पाथर्डे, लांजा तालुक्यातील हर्दखळे, वाडगाव, पूनस, बोरथडे, नाटे पोलिस स्थानकांतर्गत देवाचे गोठणे, धाऊलवल्ली, खेडमधील चाटव, सावर्डेमधील सावर्डे, मांडकी, जामसुद, गुहागरमधील आबलोली अशा 19 गावांमधील वाद सामोपचाराने सुटले आहेत.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, एसआरपी बटालियन, होमगार्ड शिमगोत्सवावर लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरासह ग्रामीण भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
कोकणातील महत्त्वाचा सण एकोप्याने उत्साहात व जल्लोषात साजरा करून वादमुक्त सणाचा आनंद घ्या, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकण, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे. कुलकण यांनी जिल्ह्यातील बंधू-भगिनींना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.