खेड : तालुक्यात पुन्हा कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात खेड-दापोली-मंडणगडचे आ.योगेश कदम यांनी प्रशाकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. आंबवली परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या आंबवली परिसराचा आढावा घेऊन त्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.
कोरोनाबाधित रुग्णांवर ज्या ठिकाणी उपचार सुरु आहेत त्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांच्याशी चर्चा करून कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने आणि योग्य उपचार कारण्यासंदर्भात सूचना केल्या.
रुग्णांवर उपचार करण्यासाठी कळंबणी रुग्णालयात मुबलक औषध साठा व साहित्य आहे कि नाही याची खात्री करून घेतली. खेडमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन आ. योगेश कदम यांनी काल आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून कोरोना रुग्णांना सेवा देण्यास प्राधान्य दिले.
कोरोनाबाधित रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन लवेल येथील घरडा कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करावे अशा सूचना आ.योगेश कदम यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनेने यांना दिले.
खेडमध्ये पुन्हा डोकं वर काढणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन योगेश कदम यांनी खेडच्या जनतेला केले.