रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई आणि दिव्यांगांसाठी समर्पित आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले जात आहे.

हे शिबिर २ मार्च २०२५ रोजी, रविवारी, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ‘आस्था थेरपी सेंटर’, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे होणार आहे.

या शिबिरात जन्मतः किंवा जन्मानंतर श्रवणदोष असणाऱ्या, ज्यांना बोलताना अडचण येते, ज्यांचे बोलणे स्पष्ट नाही, अशा सर्व बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत तपासणी आणि मार्गदर्शन उपलब्ध असेल.

श्रवण आणि वाचा दोष यांच्याशी संबंधित तपासणी या शिबिरात केली जाईल. तसेच, आवश्यक सेवांसाठी मार्गदर्शन आणि पालकांच्या शंकांचे निरसनही केले जाईल.

या शिबिरात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण आणि ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे हे तज्ञ डॉक्टर मुलांच्या ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करतील.

पालकांनी मुलांचे पूर्वीचे तपासणी रिपोर्ट (असल्यास) सोबत आणावेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही श्रवण आणि वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावी, यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे, असे आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक आणि स्पीच थेरपीस्ट संकेत चाळके यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी, जेणेकरून कोणीही या संधीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन आस्थाच्या सचिव आणि प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे.

या शिबिरासाठी नाव नोंदणी पालकांनी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ९८३४४४०२०० या नंबरवर कॉल करून करावी.