
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाणप्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचारी समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांच्यावर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या निवेदनात आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कलमान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे.
या प्रकरणात पीडित कर्मचाऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलन करण्यास बाध्य होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply