दापोली : माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, डीजीस्वास्थ्य फाउंडेशन आणि शिलक्ष्मी फाउंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच आंजर्ले प्रतिष्ठान मुंबई, आंजर्ले शिक्षण संस्था संचलित एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले, दापोली पोलीस ठाणे अंतर्गत आडेबिट, साखळोली बीट क्रमांक एक, ज्ञान समृद्धी वाचनालय साखळोली आणि कुणबी समाजोन्नती संघ कुंभवे गट यांच्या संयुक्त विद्यमाने बहुविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, 25 एप्रिल रोजी एम. के. इंग्लिश स्कूल, आंजर्ले आणि शनिवार, 26 एप्रिल रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ, साखळोली, तालुका दापोली येथे होणार आहे.
या शिबिरात डीजीस्वास्थ्य टेली मेडिसिन सेंटरद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार असून, भारतातील नामवंत डॉक्टर ऑनलाइन उपलब्ध राहणार आहेत. तसेच, एल अँड टी मेडिकल सेंटर आणि ब्रह्माकुमारीज ग्लोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर यांचे सहकार्य लाभणार आहे. एल अँड टी मेडिकल सेंटरची टीम शिबिरस्थळी प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करणार असून, लाभार्थींना दैनंदिन उपयोगाचे मेडिकल किट वाटप केले जाणार आहे.
शिबिराच्या निमित्ताने महिलांसाठी मासिक पाळीविषयक मार्गदर्शन आणि कापडी पॅडचे मोफत वितरण होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रात प्रथमच इनेबल इंडिया या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेद्वारे उपजीविका केंद्राचे उद्घाटनही याच शिबिरादरम्यान संपन्न होणार आहे.
आंजर्ले आणि साखळोली पंचक्रोशीतील नागरिकांनी या बहुविध आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सरनोबत, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक गायकवाड, बीट पोलीस हवालदार श्री. मोहिते, कुणबी समाजोन्नती संघ कुंभवे गटाचे अध्यक्ष श्री. रविंद्र घडवले, साखळोली सरपंच सौ. दिक्षा तांबे आणि ज्ञानसमृद्धी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अनिल बुरटे यांनी केले आहे.