दापोली : सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सक्रिय असलेले गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची लायन्स क्लब दापोलीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

नूतन अध्यक्षांचा शपथविधी समारंभ शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पितांबरी रुचियाना रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गुरुप्रसाद बेर्डे हे मूळचे दापोलीचे रहिवासी असून त्यांचे संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन शिक्षण दापोलीतच पूर्ण झाले आहे. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून २००४ मध्ये कृषी पदवी प्राप्त केली आहे.

सध्या ते वसई येथे वैतरणा डेअरी या नावाने दूध पुरवठा व्यवसाय करत असून पितांबरी कंपनीमध्येही ते कार्यरत आहेत. समाजसेवेची आवड असलेल्या गुरुप्रसाद बेर्डे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये कायम सक्रिय सहभाग नोंदवत समाजहितासाठी सातत्याने काम केले आहे.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन लायन्स क्लब दापोलीने त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबमार्फत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, तसेच गरजूंना मदत यांसारखे विविध लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळात लायन्स क्लब दापोलीच्या सेवाभावी कार्याला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.