गुहागरमध्ये 4 तासांत मंदिर चोरी उघड, 100% मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

गुहागर : गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री हनुमान मंदिरात 02 जून 2025 च्या मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांनी अवघ्या 4 तासांत गुन्हा उघडकीस आणून संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासोबतच चोरीस गेलेला 100% मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्याने हत्याराने उचकटून लाकडी दानपेटी चोरून नेल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 331 (3), 331 (4), 305 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 40/2025 दाखल करण्यात आला. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी तातडीने पथक नेमले.

पोलिसांनी गोपनीय माहिती आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. संशयित सौरभ संतोष कदम (रा. मळण रोड, श्रृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला घटनेनंतर अवघ्या 4 तासांत ताब्यात घेण्यात आले.

चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयिताची अटक प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी सौरभ कदम याने मंदिर चोरी किंवा घरफोडीसारखे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

ही यशस्वी कामगिरी गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजीत सोनावणे, म.पो.ना. स्वामिनी नाटेकर, पोकॉ वैभव चौगले, पोकॉ प्रतीक रहाटे, पोकॉ प्रथमेश कदम, पोकॉ निखील पाटील आणि म.पोकॉ सीमा मोरे यांनी पार पाडली.

गुहागर पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरात कौतुक होत असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*