रत्नागिरी : मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेला राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर मानांकन मिळाले असून, त्याही पुढे जाऊन जागतिक पातळीवरही या बँकेचे नाव झाले आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
मी ज्या उद्योग विभागाचा मंत्री आहे, त्या विभागाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही क्रांतिकारी योजना राबवली जाते.
मागील तीन वर्षांत ७ हजार उद्योजक घडवण्यात आम्ही यशस्वी झालो. जेव्हा माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता (पोटेन्शियल) आहे.
त्यानंतर आम्ही ती चळवळ म्हणून राबवली त्यामुळे या योजनेतून केवळ दोन वर्षांत ३२ हजार युवक-युवतींना स्वतःच्या पायावर उभे करण्यात यश आले.
यामुळे, ही योजना रत्नागिरी जिल्हा बँकेने दत्तक घेतली, तर जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो, असे मत या प्रसंगी ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक दीपक पटवर्धन, गजानन पाटील, रामभाऊ गराटे, रमेश किर यांसह मोठ्या संख्येने बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.