पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शासकीय योजनांच्या नावावर चिरीमिरी घेणाऱ्यांना इशारा, रत्नागिरीत कामगारांना अत्यावश्यक संच वाटप

रत्नागिरी : शासकीय योजनांच्या नावावर कोणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक कळवा, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. पैसे मागणाऱ्याइतकाच पैसे देणारा देखील दोषी आहे, त्यामुळे शासकीय योजनांसाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सुदेश मयेकर, बाबू म्हाप, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “शासनाच्या कामगार विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आजच्या कार्यक्रमातील गर्दीवरून दिसून येते. काही जण गैरसमज पसरवतात, मात्र मी हा कार्यक्रम थांबवला नव्हता, तर भ्रष्टाचार थांबवला होता. गृहपयोगी संचाची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे, परंतु त्यासाठी ५०० ते १,५०० रुपये घेतले जात असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. अशा व्यक्तींची तक्रार नोंदवा, त्यांना तुरुंगात टाकले जाईल.”

ते पुढे म्हणाले, “मूल जन्माला आल्यानंतर आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतरही मदत देणारी ही एकमेव योजना आहे. अशा योजनांची माहिती सर्वांनी समजून घ्यावी. तसेच, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील, ती कधीही थांबणार नाही.”

या कार्यक्रमात विष्णू विश्राम रावणंग, प्रणाली प्रकाश ताम्हणकर, प्रमोदकुमार रामगोपाळसिंह बघेल, अश्विनी अजय अंबेरकर आणि प्रतिभा परशुराम हंगीरेकर यांना विविध योजनांच्या लाभाचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच, मनिषा अनंत भातडे, कामिनी मंगेश मांडवकर, वेदिका योगेश जाधव, धनाजी आण्णा साठे आणि प्रकाश मधुकर झोरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*