रत्नागिरी : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक आणि बागायतदारांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक दर्शन काणसे, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप यांच्यासह आंबा बागायतदार उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, बागायतदारांना 2 लाखांपर्यंत पीक कर्ज देताना तारणाची गरज नाही. जिल्ह्यातील बहुतांश बागायतदारांना 2 लाखांपेक्षा जास्त रकमेची आवश्यकता असते. त्यामुळे बँकांनी करारावरील आंबा बागांचे पीक विचारात घेऊन कर्ज मंजूर करावे. तसेच, आंबा बाग कराराने घेणाऱ्या बागायतदारांचे नोंदणीकृत (Registered) करारपत्राऐवजी नोटरीकृत (Notarised) करारपत्र स्वीकारावे. पीक कर्ज नूतनीकरणासाठी प्रक्रिया शुल्क आकारताना अग्रणी बँकेच्या धोरणानुसार इतर बँकांनी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारावे, असेही त्यांनी निर्देशित केले. यावेळी, सर्व बँकांनी सिबिल स्कोर न पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बँकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच, आंबा निर्यातीवरील ड्युटी रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

याशिवाय, पंतप्रधान सन्मान योजना आणि नमो सन्मान योजनेचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी पुढील दौऱ्यात 13 फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.

Advertisement