संस्कार भारती दापोलीतर्फे आयोजित भव्य चित्रकला प्रदर्शनात स्थानिक कलाकारांचे कौशल्य प्रदर्शित

दापोली – संस्कार भारती दापोली यांच्यातर्फे आयोजित भव्य चित्रकला प्रदर्शन दापोलीतील गोपाळकृष्ण सोहनी विद्या मंदिर येथील चैतन्य सभागृहात झाले.

हे प्रदर्शन २३ मार्च २०२५ पासून सुरू झाले होते आणि दापोली व आसपासच्या परिसरातील हौशी चित्रकारांनी आपल्या आकर्षक चित्रांनी या प्रदर्शनाला सजवले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक-चित्रकार जितेंद्र पराडकर, निसर्ग चित्रकार विष्णू परीट, चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर, दापोली शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन प्रसाद करमरकर आणि मुख्याध्यापक शेठ यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी चित्रकथी कलाकार राजश्री पाटणकर, कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक दीपक हर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे जितेंद्र पराडकर आणि चित्रकार राजश्री पाटणकर यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे भावी कलाकार घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

उद्घाटनानंतर मान्यवरांनी सर्व चित्रांचे अवलोकन करून कलाकारांना दाद दिली. यानंतर चैतन्य सभागृहात निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांचे निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिक झाले, ज्याला विद्यार्थी आणि हौशी चित्रकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

त्याचवेळी चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर यांनी चारकोलमध्ये लाइव्ह पोर्ट्रेट सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी आणि चित्रकार भारावून गेले.

या प्रदर्शनात दापोली परिसरातील २८ हौशी चित्रकारांची १५० हून अधिक चित्रे प्रदर्शित करण्यात आली. जलरंग, ऍक्रालिक, पेन्सिल, चारकोल, पोस्टर रंग अशा विविध माध्यमांतून काढलेली निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, स्थिरचित्रे, अमूर्त चित्रे आणि विविध शैलीतील चित्रप्रकार येथे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, मीनल लिमये यांची रेडी रांगोळी ही वेगळी कलाकृती या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून दापोलीतील कलाप्रेमी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत होते.

गेल्या चार वर्षांपासून संस्कार भारती दापोलीतर्फे असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. येथील चित्रकार आपल्या अनोख्या शैलीने कलारसिकांचे आणि दापोलीवासीयांचे मन जिंकत आहेत.

या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विद्याधर ताम्हनकर, युवराज पेठे, संजय दळवी, प्रसन्न चिंदे आणि शलाका मालू यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर ताम्हनकर यांनी केले.

सहभागी चित्रकारांमध्ये संजय दळवी, विद्याधर ताम्हनकर, युवराज पेठे, प्रसन्न चिंदे, प्रशांत निवाते, ए.एस. पेटकर, सागवेकर, आर्या लिमये, साइराज भडवळकर, मयुरी झूजम, ऋतिक नामोळे, हेमंत जोशी, विभव गोंधळेकर, नबा मुन्शी, श्रीईशा करंदीकर, राधिका माणकापुरे, रेखा जेगरकल, अद्विता कस्तुरे, धनश्री आर्यन कस्तुरे, सौम्या खोचरे, अस्मिता मालू, शलाका मालू, आकांक्षा अस्वले, राधिका मालू, सृष्टी मालू, निर्मला करवा, सविता उजाळ, प्रतीक्षा थोरात, वल्लरी पेठे, सोनाली सावंत, सुशील पाटील, पंकज डोळस आणि मीनल लिमये यांचा समावेश होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*