दापोली : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने पाग व्यायामशाळा, चिपळूण येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील कुमारी गार्गी रेवाळे हिने १७ वर्षे वयोगटात दुसरा क्रमांक पटकावला, तर श्रीराज रेवाळे याने पाचवा क्रमांक मिळवला. या यशामुळे दोघांनाही विभागीय स्तरावरील स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समिती अध्यक्ष जयवंत जालगावकर, सदस्य आप्पा खोत, अशोक जाधव आणि मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.