करोना निर्बंध काळातही गणेशभक्तांची कोकण रेल्वेवर झुंबड

मुंबई : करोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली. कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात ३००च्याही पुढे गेली आहे. येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागली आहे.

गेल्या वर्षी १८४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे अनेकांनी आठ ते दहा दिवस आधीच खासगी वाहनांनी कोकण गाठले. त्यामुळे कोकण रेल्वेला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला ८ जुलैपासून सुरुवात झाली.

गाडी क्रमांक ०१२२७- ‘सीएसएमटी ते सावंतवाडी’ ५ सप्टेंबरपासून दररोज धावणार आहे. या गाडीच्या शयनयान श्रेणीला (स्लीपर क्लास) ५ सप्टेंबरला ८१, तर ७ सप्टेंबरला ३६३ आणि ९ सप्टेंबरला ३९९ अशी प्रतीक्षा यादी आहे. आसन श्रेणीसाठी ७ सप्टेंबरला २६० प्रतीक्षा यादी असून ८ आणि ९ सप्टेंबरला तिकीटच उपलब्ध नसल्याचे दाखवले जात आहे. गाडी क्रमांक ०१२३१- ‘पनवेल ते सावंतवाडी’ आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ७ सप्टेंबरपासून धावणाऱ्या या गाडीची आसन श्रेणीतील प्रतीक्षा यादी १८६ आणि ८ सप्टेंबरच्या गाडीची प्रतीक्षा यादी ३००च्या वर गेली आहे.

लवकरच नियमावली

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांचा आढावा घेऊन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल, असे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*