
दापोली : बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी दापोली शहर व्यापारी महासंघाने योगेश कदम यांना निवेदन दिले आहे.
या आगीत पाच दुकानांचे नुकसान झाले असून दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. काही व्यापाऱ्यांचे ७० ते ८० लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
निवेदनात महासंघाने स्थानिक प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांकडे लक्ष वेधले आहे. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पोहोचण्यास उशीर झाल्याने आणि बाजारपेठेतील फायर हायड्रंट व लाईट पोल खराब असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे.
आगीत बाधितांना तातडीने भरपाई मिळावी आणि शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर योगेश कदम यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply