संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात सुरज फडकले (३५, तुरळ) आणि संदेश भोजने (४०, धामापूर) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०८ बीए ७१६२ क्रमांकाची ॲक्टिव्हा आणि एमएच ०८ एएम ६९६४ क्रमांकाची युनिकॉर्न या दोन दुचाकी गणेश मंदिराच्या नजीक समोरासमोर जोरदार धडकल्या.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती, की दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले.

अपघातानंतर लगेचच दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती होती, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

एकाच वेळी दोन्ही मार्गिका सुरू असल्याने किंवा कामामुळे अचानक मार्गिका बदलल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या अपघातानंतर महामार्गावरील कामाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्ग प्राधिकरणाने आणि ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. संगमेश्वर पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.