खेड : तालुक्यातील शेतकऱ्याना सन २०२२-२३ यावर्षीचा फळपीक विमा योजनेचा रिलायन्स कंपनीचा १३ हजार रुपयांचा प्रिमियम बँकेमार्फत परस्पर भरलेला असतानाही कंपनीने हा विमा रकमेचा परतावा अद्याप दिलेला नाही.
या निषेधार्थ गुरुवारी, 23 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी खेड कृषी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांचा वतीने संतोष दत्ताराम खोपकर, विजय अर्जुन निकम व प्रकाश शंकर जंगम यांनी खेड तालुका कृषी अधिकारी यांना दिला आहे.
तसेच पुढील वर्षीचा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर 2023 आहे, असे असताना आम्ही पुढील पीक विमा रकमेचा प्रिमियम कसा काय भरावयाचा? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने सर्व रक्कम रिलायन्स कंपनीला परताव्याच्या स्वरुपात दिलेली आहेत. तरी देखील कंपनी विमा रकमेचा परतावा देत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. त्यामुळे खेड कृषी कार्यालयाने आपल्या स्तरावरुन कंपनीला सूचना देऊन गुरुवार, दि. २३ नोव्हेबर २०२३ पर्यंत विमा रकमेचा परतावा देण्यासाठी प्रयत्न करावेत.
अन्यथा दि. २३ रोजी आम्ही सर्व शेतकरी खेड कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.