दापोली – आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात लावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

चंद्रनगर शाळेतील शिक्षक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी वेदक हे आधीच नियोजन केल्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपारिक भात लावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी गावातील शेतकरी असलेल्या सचिन मिसाळ यांच्या शेतात घेऊन गेले होते.

त्यांच्या शेतात सर्व विद्यार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांसोबत तरवा काढणे, चिखल करणे, चिखलासाठी नांगर फिरविणे, भाताची लावणी करणे यांसारखी कामे केली. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत भात लावणीची कामे केली. कोकणातील पारंपारिक शेतीविषयीची माहिती देतानाच तेथील शेतकरी स्री पुरुषांनी पारंपारिक भलारी गीतांचे गायन करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.

यावेळी सचिन मिसाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी भाजी भाकरीच्या न्याहरीची व्यवस्था केली होती. शेतात काम करताना व भात लावणीची सारी कामे करताना शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक शेतात रममाण झाले होते. गावातील सर्व शेतकरी व पालकांनी या निमित्ताने आनंददायी शनिवार या उपक्रमाचे कौतुक केले आहे.