दापोली- कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोली तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कोमसाप दापोली शाखेच्या वतीने अध्यक्ष चेतन राणे यांनी केले आहे.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात जयवंत दळवी यांचे फार मोठे योगदान आहे. आजही मराठी साहित्य क्षेत्रात जयवंत दळवी यांचे नाव फार मोठ्या आदराने घेतले जाते.

सन २०२३-२४ हे वर्ष ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कोकणातील सर्वच शाखांमधून विविध साहित्य विषयक उकक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

कोमसाप दापोली शाखेच्या वतीनेही यानिमित्त दापोली तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही निबंधलेखन स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गट स्तरावर होत असून निबंधलेखनाचे विषय ‘मला भावलेले जयवंत दळवी’ व ‘जयवंत दळवींचे साहित्य विषयक योगदान’ असे आहेत.

इयत्ता पाचवी ते सातवीसाठी निबंधलेखनासाठीची शब्दमर्यादा ३०० इतकी आहे. इयत्ता आठवी ते दहावी साठी शब्दमर्यादा ४०० तर इयत्ता अकरावी ते पंधरावी साठी ५०० इतकी शब्दमर्यादा ठेवण्यात आली आहे.

कागदाच्या एकाच बाजूस स्वहस्ताक्षरातील निबंध अरविंद मांडवकर यांचेकडे दि. १३ ऑक्टोबर २०२४ या तारखेपर्यंत जमा करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

यासाठी अरविंद मांडवकर यांच्या ९४२१३८००४२ या क्रमांकावर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात येत असून या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी रामराजे महाविद्यालय, दापोली येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून होणार आहे.

रोख रक्कम, सन्मानपत्र व पदक असे बक्षिसाचे स्वरुप असून दापोली तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांनी केले आहे.