अभियंता दिन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतात दरवर्षी त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

भारताचे महान अभियंता आणि अभियांत्रिकीचे जनक म्हणून ओळखले जाणारे सर एम. विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्याची माहिती दिली.

अभियंता दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील अभियंते श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. अभिजित पाटील, तांत्रिक सहाय्यक श्री. सुरेश हातागळे आणि विद्युत सहाय्यक श्री. संदेश चव्हाण यांचा प्राचार्य डॉ. चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले आणि या जयंती उत्सवात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*