दापोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन आणि लेखन कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रकट वाचन आणि श्रुतलेखनावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन कोळबांद्रे समूह साधन केंद्र समन्वयक संजय जंगम यांनी केले. गावतळे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत आज आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेचे अध्यक्षस्थान गावतळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भक्ती सावंत यांनी भूषवले. परिषदेच्या सुरुवातीला हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मंत्रमुग्ध करणारे स्वागत केले. यानंतर मार्गदर्शक राहुल बडे यांनी खान अॅकेडमी आणि शिक्षण प्रक्रियेसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

संजय जंगम यांनी प्रशासकीय मार्गदर्शन करताना शालेय प्रगतीसाठी विविध विषय, व्हिजन दापोली, निपुण महाराष्ट्र, जातीचे दाखले, आधार अपडेट आणि विविध योजनांची पूर्तता करण्यासाठी सर्व शाळांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यप्रेम घुगे यांनी केले.

यावेळी केंद्रात नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. गावतळेच्या सरपंच विधी पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली पवार, उपाध्यक्ष विनोद पवार, संजय मेहता, शामराव वरेकर, महेंद्र कलमकर, मनोहर सनवारे आदी मान्यवर उपस्थित होते.