रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशखिंड इथं शेतामध्ये हत्ती अवतरला आहे. या हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकं या शेतामध्ये गर्दी करत आहेत. कोकणातलं सौंदर्य त्यात अशा कलेचा अविष्कार म्हणजे सोन्याहून पिवळं अशा प्रतिक्रिया सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेला मिळत आहेत.

चिपळूण – गुहागर मार्गावरील गणेशखिंड येथील रस्त्याच्या शेजारी भाताच्या खाचराच्या कॅनव्हासवर सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने बनवलेला भाताच्या रोपांचा हत्तीच्या कलाकृतीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पाचाडचे माजी सरपंच बारकू खोपडे यांच्या शेतात, शेत नांगरून पेरणी करतानाच हत्तीच्या आकारात पेरणी करण्यात आली होती. शेतामध्ये हत्ती ही कलाकृती साकारण्याचं काम चिपळूणचे कलाकार संतोष केतकर यांनी केले आहे.

ही कलाकृती साकारण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते राम मोने, भाऊ काटदरे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सागर रेडीज, राजेंद्र हमारे, सोहम घोरपडे, निकेत नार्वेकर यांनी परिश्रम घेतलं.

शेतातील या हत्तीचा फोटोच इतका मोहक आहे तर प्रत्यक्षात पाहण्याची मजा काही औरच असेल. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीनं असे अनेक उपक्रम या भागात रबविले जातात. कासव संवर्धनामध्येही या संस्थेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.