ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. अन्य जागांसाठी मात्र निवडणूक होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी दिली.

राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच चार महानगरपालिकांतील ४ रिक्त पदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० जागांसाठी याच दिवशी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण स्थगितीचा आदेश दिल्यानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. ओबीसी जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

या निर्णयामुळे नागरिकांचा ओबीसींच्या भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेतील २३ तसेच १५ पंचायत समित्यांमधील ४५ जागांवर मतदान होणार नाही. तसेच १०६ नगरपंचायतीमधील ३४४ आणि महापालिकेतील एक अशा ४१३ जागांवर निवडणूक होणार नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*