दापोली-  तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंगळे येथे सुकोंडी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच पार पडली.

सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकांत बापट हे शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण परिषदेसाठीच्या व्यासपीठावर दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, कोंगळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयेश कासारे, उपाध्यक्ष अश्विनी साळवी, कोंगळे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी, विठ्ठल मोहीत, उत्तम साळवी, महेश साळवी उपस्थित होते.

कोंगळे शाळेस पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून यावेळेस कोंगळे ग्रामस्थ व मुंबई मंडळाकडून सुकोंडी केंद्रातील सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

शिक्षण परिषदेत पुस्तक परिचय विषयास अनुसरून केकान यांनी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन विषयावर भदाने यांनी तर पालकसभा विषयावर मुंढे यांनी मार्गदर्शन केले.

केंद्रप्रमुख श्रीकांत बापट यांनी प्रशासकीय बाबींवर चर्चा केली. संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन हनमंत गरंडे, प्रियांका वसावे यांनी केले तर मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी यांनी सर्वांचे आभार मानले.