दापोली: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक १ येथे मंगळवार, ११ मार्च रोजी कोळबांद्रे केंद्राची शिक्षण परिषद ज्येष्ठ शिक्षक प्रमोद तेवरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये कशी आत्मसात करता येतील, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ प्रभावीपणे शाळेत कसा राबवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रमाची माहिती दिली.
मनोहर सनवारे, विलास सकपाळ आणि विकास पटले यांनी ‘स्काफ’ (SQAAF) विषयी मार्गदर्शन केले, तर सत्यप्रेम घुगे यांनी फोर्टीफाईड तांदळाची गुणवत्ता आणि त्याचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले.
केंद्रप्रमुख जंगम यांनी प्रशासकीय माहिती देत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
मुख्याध्यापक संजय मेहता यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल जंगम व घुगे यांचा सन्मान केला.
समीर ठसाळ यांनी आभार मानले. परिषदेत प्रमोद तेवरे, संजय जंगम, संजय मेहता, महेंद्र कलमकर, मनोहर सनवारे, शामराव वरेकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
परिषद यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.