ईडीचा अनिल देशमुखांना दणका ! तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केली आहे. सुरुवातीला देशमुख यांची चार कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता ईडीने देशमुख यांची तब्बल ३५० कोटींची संपत्ती जप्त केल्याचं समोर आलं आहे.

ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख असल्याचं सांगितलं होतं. मात्र ही किंमत खरेदीची किंमत आहे. या मालमत्तेची सध्याच्या बाजारभावानुसारची किंमत तब्बल 350 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्‍स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचाही समावेश आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. मात्र त्यांनी हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*