नवी दिल्ली: दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी बिनॉय बाबूंना जमीन देताना सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे. खटल्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने ईडीला सांगितले आहे.
गेल्या 13 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी बिनॉय बाबूला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला खटल्यापूर्वी इतके दिवस तुरुंगात ठेवू शकत नाही.
हे कधी दूर होईल हे आपल्या सर्वांना माहीत नाही. न्यायमूर्ती खन्ना यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, सीबीआय आणि ईडीच्या आरोपांमध्ये विरोधाभास असल्याचे दिसते.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भट्ट यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर करताना सांगितले की, बिनॉय बाबू यांनी 13 महिने तुरुंगवास भोगला आहे आणि त्यांच्या अर्जात अनेक तथ्यात्मक परिस्थिती उपस्थित करण्यात आली आहे.
खंडपीठाने पुढे सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही आणि आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, वरील तथ्ये लक्षात घेऊन अपीलकर्त्याला (बाबू) जामिनावर सोडण्याची परवानगी आहे.
सर्वोच्च न्यायालय बिनॉय बाबू यांच्या अपीलवर सुनावणी करत होतं. ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या ३ जुलैच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांना दिलासा नाकारण्यात आला होता.
इतर प्रकरणाचं काय?
बाकीच्या प्रकरणांमध्ये देखील सुप्रीम कोर्ट अशाच प्रकारे निर्णय देता का? हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण ईडीने अटक केलेले अनेक आरोपी आजही जेलमध्ये आहेत. त्यांना जामीन मिळत नाहीये. त्यामध्ये उद्योजक आणि अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम हे देखील आहेत.
समर्थकांमध्ये आशेचा किरण
सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीमुळे सदानंद कदम यांच्या समर्थकांमध्ये आशेचा किरण प्रज्वलित झाला आहे. सदानंद कदम जामिनासाठी उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. परंतु त्यांना दिलासा मिळू शकला नाहीये. आता त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. ते गेल्या जवळजवळ नऊ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्री संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.