दापोली : दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ शाळेत यंदा गुरुपौर्णिमा अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शिक्षकांच्या नावाने झाडे लावून त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला.

हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला असून, विद्यार्थ्यांच्या या अनोख्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग घेतला. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे महत्त्व जाणून त्यांनी प्रत्येक झाडाला आपल्या शिक्षकांचे नाव देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

ही संकल्पना पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधांना बळकटी देणारी ठरली आहे.

अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची कल्पना सर्व शाळांमध्ये राबवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाकवली शाळेचे मुख्याध्यापक जावेद शेख यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

“विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही सद्भावना आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता मनाला स्पर्शून गेली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये आणि पर्यावरण संरक्षणाची भावना रुजते,” असे त्यांनी सांगितले.

हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्याचा अनोखा संगम ठरला आहे.

भविष्यात अशा उपक्रमांना आणखी प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा शिक्षक आणि स्थानिक समुदायातून व्यक्त होत आहे.