खेड : खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर येथील धरणापासून ४१.६ किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खेड तालुक्यातील अस्तान, खोपी, शिरगाव, सवेणी, मोहाने, आंबवली, बिजघर, तिसंगी, एनवरे, ऐनवली, तळे अशा सुमारे ४७गावांमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून भूकंपाचे धक्के जाणवले. खेड शहरातही भूकंप झाल्याचे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी अनुभवले.