दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनारी रविवारी (दि. 23) एक पर्यटक समुद्रात पोहताना बुडाला.
पर्यटकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व स्थानिकांच्या तात्काळ मदतीमुळे पर्यटकाला सुखरूपपणे वाचवण्यात आले.
पर्यटकांचा गट आंजर्ले येथे समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने गटातील एक पर्यटक बुडाला.
पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने किनाऱ्यावरील मकरंद महादलेकर यांच्या ही बाब लक्षात आली.
त्यांनी तातडीने माजी सरपंच संदेश देवकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
संदेश देवकर यांनी बाळा केळसकर यांना फोन करून घटनास्थळी जाण्याची सूचना केली.
बाळा केळसकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी त्वरित पोहोचले.
बाळा केळसकर, सूरज रहाटवळ, बाब्या मयेकर आणि अथर्व सरनोबत या स्थानिकांनी बुडणाऱ्या पर्यटकाला तत्काळ बाहेर काढले व त्याचे प्राण वाचवले.
पर्यटकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु पर्यटकाचे नाव कळू शकले नाही.