दापोली – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. संजय भावे हे या विद्यापीठाचे १५ वे कुलगुरु म्हणून विद्यमान कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडून पदभार स्विकारतील.

डॉ. संजय भावे हे सिंधुदुर्ग जिल्हयाचे सुपुत्र असून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठामधून अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन (Genetics and Plant Breeding) या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे.

नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांचं अभिनंदन करताना सौ. भावे

गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात सहाय्यक प्राध्यापक या पदापासून केली. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता (वनशास्त्र), संचालक, विस्तार शिक्षण, या पदांवर काम केले आहे. सध्या ते विद्यापीठामध्ये संशोधन संचालक या पदावर कार्यरत आहेत.

डॉ. संजय भावे यांनी आतापर्यंत १२ आचार्य पदवी विद्यार्थ्यांना तर ३५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन कल आहे.

एक संशोधक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत विविध तृणधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या २१ जाती विकसीत केल्या आहेत. लाल भाताची रत्नागिरी- ७ आणि रत्नागिरी-८ या जाती विकसीत करण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम करताना त्यांनी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण महोत्सवी कृषी महोत्सवाचे आयोजन करून विद्यापीठाचे तंत्रज्ञान लाखो शेतकन्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळवले.

त्याचबरोबर कोकणातील विविध गावांमध्ये एक गाव एक उत्पादन ही संकल्पना राबविली. शेतकन्यांसाठी किमान कौशल्यावर आधारीत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले, सिंधुदुर्ग जिल्हा विकास नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा दलांची स्थापना केली आणि त्यातून शेतकन्यांच उत्पादन वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले.

डॉ. भावे यांच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.

डॉ. भाव यांच्या रुपाने एक जाणकार, लोकप्रिय आणि अनुभवी व्यक्ती कुलगुरुपदी विराजमान होणार असल्याने विद्यापीठ परिवारात तसेच कोकणात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याशी चर्चा करताना संपादक मुश्ताक खान