दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई आणि श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय दप्तर, लेखन साहित्य, कंपास पेटी, चित्रकला साहित्य आदींचे वाटप करण्यात आले. साखळोली नं. १ शाळेत प्रमोद जोशी, दिनेश नाटेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, सदस्य गौरी देवघरकर, मनोज जाधव आणि मुख्याध्यापक संजय मेहता यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संजय चोरमले, समीर ठसाळ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सांगण्यात आले की, राज्यभरात ५,००० दप्तरांचे वाटप करण्यात आले, त्यापैकी दापोलीत ११३२ दप्तरे वितरित करण्यात आली. यावेळी साखळोली शाळेतील विद्यार्थिनी सिया महेश देवघरकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, “आमच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील अनेक संस्था पुढे येतात. त्यापैकी सेवा भारती कोकण प्रांत, ट्रस्ट फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, दापोली यांचे शिक्षक दिनेश नाटेकर सर आम्हाला विज्ञानाचे प्रयोग दाखवून संकल्पना स्पष्ट करतात आणि छोटे-छोटे प्रयोग करायला शिकवतात. संस्थेने दप्तरे देऊन आमची सेवा केली आहे. भविष्यात आम्हालाही अशी सेवा करता यावी, अशी इच्छा आहे.” तिने सर्वांचे आभार मानले.

दापोली तालुक्यातील साखळोली, कोळबांद्रे, खेर्डी यासह २७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या दप्तरांचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी सौरभ बोडस, निलेश जोशी यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*