देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दि. 13 जून 2025 रोजी रात्री 20:35 वाजता साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील मूर्ति चेकपोस्ट येथे नियमित गस्ती दरम्यान देवरुख पोलिसांनी संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-08-M-4929) थांबवले.

वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बैल आखूड दोरीने बांधलेले आढळले. बैलांना हालचाल करता येणार नाही आणि त्यांना वेदना होतील अशा प्रकारे वाहतूक केली जात होती. वाहनाला ताडपत्रीने बंदिस्त केले होते, तसेच गुरांसाठी आवश्यक विभाजन किंवा वैद्यकीय तपासणी न करता, परवाना नसताना ही वाहतूक सुरू होती. चौकशीदरम्यान, वाहनचालक सागर पाटील (वय 31, रा. पिशवी केळेवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), प्रदीप लाटवडेकर (रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि बैल मालक नागेश कदम (रा. बौद्ध वाडी, देवरुख) यांनी ही जनावरे कत्तलासाठी अवैधपणे वाहतूक करत असल्याचे कबूल केले.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 66/2025 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5(अ), 5(ब), 9, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1), (घ), (ङ), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, 3/181, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47, 48, 49, 50, 51, 54, 56 आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 3(5) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ₹3,50,000 किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप, ₹13,000 किमतीचा एक बैल आणि ₹10,000 किमतीचा दुसरा बैल असा एकूण ₹3,73,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, गोवंश बैलांची सुटका करण्यात आली. आरोपी सागर पाटील याला भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35(3) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपी नागेश कदम याच्यावर यापूर्वीच देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 103/2024 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंद आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस हवालदार नितीन जाधव, संजय करांडे, सुहास लाड, तानाजी पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल तुळसणकर यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*