दापोली शहरात डेडिकेटेड कोरोना सेंटरचा विषय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दोन दिवसापूर्वी दापोलीत डीसीसी सेंटर झाले नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा आपल्याच सरकारविरोधात दिला होता. परंतु यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून लवकरच दापोलीत डीसीसी सेंटर सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुनील तटकरे यांची शिष्टाई यावेळी उपयोगी पडल्याची माहिती राष्ट्रवादीनं दिली खहे.

दापोली तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांवर दापोलीत उपचार मिळण्या ऐवजी रत्नागिरी जिल्हा कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते. त्यामुळे रत्नागिरीपर्यंत जाई पर्यंत त्या रुग्णांचे हाल होतात, काही रुग्ण घाबरून दगावले आहेत. दापोलीत डिसीसी सेंटर झाल्यास त्याचा फायदा दापोली , खेड , मंडणगड या तिन्ही तालुक्यातील गावांना होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून दापोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणीक्षकरण्यात आली होती.

रत्नागिरी – रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी तात्काळ हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे , जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे निदर्शनास आणून दिलं. या विषयाची दखल महाविकास आघाडी सरकारने घेतली असून लवकरच दापोलीत डेडिकेटेड कोरोना सेंटर होणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकारांना दिली दिली आहे.