राजापूर – राज्यात एसटी कर्मचाऱ्यांची मागणी अजूनही मान्य झाली नाही त्यामुळे जवळपास गेल्या 50 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. या दरम्यान कामावर रूजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. असे असताना आज सुद्धा एका एसटी कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
राकेश रमेश बांते, वय 35 असे या कर्मचाऱ्याचे नाव असून राजापूर आगारात चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी ते सांभाळत होते. डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. राजापूर आगारात सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये राकेश यांचाही समावेश होता.
राकेश यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांना काल रात्री ह्र्दयविकाराचा झटका आला त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील राकेश यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले आहेत.