दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला.

काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

दापोली अर्बन सायन्स सिनियर कॉलेजच्या सभागृहात हा काव्योत्सव उत्साहात पार पडला.

या काव्योत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३० हून अधिक तरुण कवींनी स्वलिखित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटन

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देवी शारदेच्या पूजनाने झाली. यावेळी कोमसापचे अध्यक्ष चेतन राणे, कोमसाप युवाशक्ती दक्षिण कोकण प्रांत प्रमुख अरुण मोर्ये, दापोली अर्बन सायन्स सिनियर कॉलेजचे प्राचार्य संदेश जगदाळे, नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, रामराजे महाविद्यालयाचे अध्यक्ष संदीप राजपुरे, दापोली ए.जी. हायस्कूल शालेय समितीचे चेअरमन रविंद्र कालेकर, दापोली अर्बन बँकेचे सीईओ संभाजीराव थोरात, प्रा. घनश्याम साठे,माजी अध्यक्षा रेखा जेगरकल, कवी सुदेश मालवणकर, मुश्ताक खान, प्रा. कुणाल मंडलीक, कैलास गांधी, बाबू घाडीगांवकर, अरविंद मांडवकर, सुनील कदम, संदीप यादव, राजेश पवार, शमशाद खान उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. कुणाल मंडलीक यांनी काव्योत्सवाची उद्दिष्टे स्पष्ट केली.

स्पर्धेतील विजेते

काव्यवाचन स्पर्धेत सलोनी विनायक शिगवण आणि रिद्धी रवींद्र जाधव यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. सुदैवी अनिल तांबे आणि सानिका सदानंद जोशी यांना संयुक्तपणे द्वितीय, तर स्वरा मंदार जोशी आणि धनश्री पवार यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळाला. मुस्कान युनूस शेख आणि लावण्या अरुण महाडिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्रे, तर सहभागी कवींना प्रशस्तीपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांचे विचार

यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या व नगरसेविका साधना बोत्रे म्हणाल्या, “हा कार्यक्रम उत्तमप्रकारे आयोजित केला असून तो यशस्वी झाल्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करते. अशा सुंदर कार्यक्रमाचा भाग होताना मला खूप आनंद झाला. भविष्यातही मला या संस्थेशी जोडले जाण्यास नक्कीच आवडेल.”

दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. जयवंत जालगांवकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी एका रात्रीत लिहिलेली कविता पाठवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ती कविता बँकेचे सीईओ संभाजीराव थोरात यांनी वाचून दाखवली. डॉ. जयवंत जालगांवकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

दापोली ए.जी. हायस्कूल शालेय समितीचे चेअरमन आणि ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रविंद्र कालेकर यांनी विद्यार्थ्यांच्या काव्यलेखन कौशल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी दाखवलेली काव्यलेखनाची कला आणि सादरीकरणाची पद्धत कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे साहित्यिक उपक्रम आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, दापोली शाखेचे या उपक्रमासाठी विशेष अभिनंदन. लेखन आणि वाचनाचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे, कारण यातूनच वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धी वाढते.”

रामराजे महाविद्यालयाचे अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी सहभागी कवींना लेखनाची सवय कायम ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष अटळ आहे, आम्ही देखील संघर्ष करूनच यश मिळवले आहे. आजकाल लेखक आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी खूप चांगल्या संधी आहेत. सोशल मीडियाने प्रत्येकाला आपले विचार मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ दिले आहे. एक चांगली कविता देशाच्या सीमा ओलांडून प्रवास करते. या उपक्रमाबद्दल मी कोकण मराठी साहित्य परिषद, दापोली शाखेला शुभेच्छा देतो.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी मुश्ताक खान आणि युवाशक्ती प्रमुख तेजस मेहता यांनी केले. अध्यक्ष चेतन राणे यांनी सर्वांचे आभार मानत काव्यसंस्कृती जपण्याचा आणि तिला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसाप दापोलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.