दापोली:- महापुराच्या संकटात सापडलेल्या व्यापारी व नागरीकांची तातडीची गरज भागविणेसाठी दापोली अर्बन बॅकेच्या संचालक मंडळाने खास सभेत अत्यंत कमी व्याजदराच्या कर्ज योजना मंजूर केल्या आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पुराने पाणी भरून व्यापारी व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रसंगातून त्यांना पुन्हा उभारी घेता यावी यासाठी दापोली अर्बन बँकेने कमी व्याजदराच्या पुनर्वसन कर्ज योजनाव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.

या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या छोटे व्यापारी व नागरिकांना १ लाखापर्यंतचे कर्ज एका सक्षम जामिनाच्या तारणावर केवळ ७% व्याजाने देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

महापुरामध्ये ज्या मोठ्या व्यापारी बांधवांचे नुकसान झाले अशा मोठ्या व्यापाऱ्यांना २५ लाखापर्यंतचे कर्ज फक्त ९ % व्याज दराने बँक देणार आहे. या कर्जाकरीता ८५ दिवसाचा मॉरेटोरिअम पिरिएड देण्यात येणार असून या कालावधीतील फक्त व्याजाचीच रक्कम भरावी लागणार आहे. कर्जाचा हप्ता त्या कालावधीनंतर भरावा लागणार आहे.

व्यापारी बांधवांना आपल्या दुकानातील फर्निचरचे खरेदीकरीता रु. ३ लाखापर्यंतचे कर्ज बँक केवळ ९ % व्याज दराने देणार असून त्याचा परतफेडीचा कालावधी ६० महिने पर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे पुरामध्ये ज्या नागरिकांचे गृहपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना गृहपयोगी वस्तूचे खरीदीकरीता रु. २५ हजार पर्यंतचे कर्ज फक्त ७ % व्याजाने देण्यात येणार असून त्यांच्या परतफेडीचा कालावधी ३६ महिने ठेवण्यात आला आहे.

महापुरामध्ये ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना घराचे बांधकामासाठी रु. ५ लाखापर्यंतचे कर्ज कमी व्याजदराने दिर्घ मुदतीसाठी देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा पूरग्रस्त व्यक्तींनी त्या त्या भागातील बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध करून ठेवलेल्या मागणी अर्जाद्वारे आपली मागणी करावी. म्हणजे कागदपत्रे व इतर बाबींची पुर्तता करून घेवून बँकेला त्वरित कर्ज उपलब्ध करून देता येईल.

कर्ज योजनांचा लाभ दिनांक २० ऑगस्ट २०२१ पर्यंत घेता येणार असून, या कर्जयोजनांचा लाभ बँकेच्या शाखा क्षेत्रातील नागरिक व व्यापारी बांधवांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर आयोजित पत्रकार परिषदेत यांनी केले आहे.

यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक सुभाष मालु, माधव शेट्ये, कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात, मुख्य व्यवस्थापक रमेश कडू, बँकेचे लेखापरिक्षक संदीप खोचरे आदी संचालक मंडळ उपस्थित होते.