Dapoli : वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी दापोली येथील सुकोंडी तलाठी अक्षय शिवगोड्डा पाटील (30) याला 7 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आहे.

तक्रारदार यांच्याकडून अक्षयनं 10 हजारांची लाच मागितली होती. त्यातील 7 हजार रुपये घेताना अक्षय पाटील याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने दापोली नगर पंचायती समोरील रस्त्यावर रांगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी 1.53 वाजण्याच्या सुमारास झाली.

लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे वडीलांनी मौजे सुकोंडी येथील जामीन तक्रारदार यांचे नावावर करणेबाबत मृत्युपत्र केले होते. सदरची जमिन मृत्युपश्चात तक्रारदार यांचे नावावर होण्यासाठी तकारदार यांनी तलाठी सुकोंडी यांचेकडे अर्ज सादर केला होता सदरची जमिन त्यांच्या नावावर करून तसा ७/१२ उतारा देण्याकरीता अक्षय पाटील, तलाठी सजा सुकोंडी ता. दापोली यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी लोकसेवक अक्षय पाटील यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे दिनांक २१/०९/२०२२ रोजी लाच रक्कमेच्या मागणीची तकार दिलेली आहे. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक २१/०९/२०२२ रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये लोकसेवक श्री. अक्षय पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या वडीलांच्या नावावर असलेली जमिन त्यांचे नावावर करून सदर जमिनीचा ७/१२ उतारा देण्याकरीता ७०००/- रुपये लाच रक्कमेची म केल्याचे निष्पन्न झाले.

पडताळणीमध्ये निष्पन्न झालेनुसार तक्रारदार यांचे वडीलांच्या मृत्युपत्रानुसार मौजे सुकोंडी येथील जमिन तक्रारदार यांच्या नावावर करुन जमिनीचा ७/१२ उतारा देण्याकरीता लोकसेवक अक्षय पाटील यांनी तडजोडीअंती ७,०००/- रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन दिनांक २१/०९/२०२२ रोजी १३.५३ वाजता दापोली नगर परिषदेच्या समोरील रोडवर पंचासमक्ष स्विकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची सापळा कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, पोलीस उप अधीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर व चालक पोलीस नाईक प्रशांत कांबळे यांनी केली आहे.