रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यानं यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. 2016 साली इंजिनिअर झालेल्या श्रीकांत खांडेकरनं दापोलीचं नाव उंचावलं आहे. श्रीकांत मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील आहे. यूपीएससी परीक्षेत त्यानं 231वा क्रमांक पटकावल्यानं त्याच्या प्राध्यापकांचा उर भरून आला आहे.
श्रीकांत खांडेकर हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांनं डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून 2016 मध्ये वर्षी बी. टेक.ची पदवी प्राप्त केली होती. दापोली येथे बी. टेक. पूर्ण करुन त्यानं एम. टेक करण्यासाठी तो भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, दिल्ली येथे गेला. त्यानंतर त्यांनं 2018 मध्ये यूपीएससीची पूर्वपरीक्षा दिली. ऑक्टोबर 2019 मध्ये अंतिम परीक्षा दिल्ली येथे झाली. त्याचा निकाल आज लागला आणि सर्वांचा आनंद गगनात मावेनेसा झाला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ. अतुल मोहोड, निलेश शिरसाट, डॉ. सचिन नांदगुडे, प्रोफेसर दिलीप महाले, डॉ. महानंद माने आदी प्राध्यापक वर्गाचं त्याला मार्गदर्शन लाभलं होतं. भारतीय प्रशासकीय सेवेतील श्रीकांत खांडेकर या माजी विद्यार्थ्याच्या या अत्युत्तम यशाबद्दल कुलगुरू डॉ.संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी त्याचं अभिनंदन केले आहे.