दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना दापोली तालुका शाखेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कुणाल कामरा याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

घटनेचा तपशील:
कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

या टिप्पणीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले, आणि अनेक ठिकाणी कुणाल कामरा याच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या.

शिवसेनेची भूमिका:
शिवसेना दापोली तालुकाप्रमुख उन्मेश राजे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.

निवेदनात, कुणाल कामरा याच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उन्मेश राजे यांनी सांगितले की,

कुणाल कामरा याने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर खालच्या स्तरावर टीका केली आहे. हे सहन केले जाणार नाही. त्याने सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते:
या आंदोलनात दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, माजी जि.प. सभापती चारुता कामतेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, महिला शहराध्यक्ष रसीका पेठकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, युवतीसेना संघटक कीर्ती परांजपे, छोटा व्यापारी संघटना अध्यक्ष राजेंद्र बोथरे, उपशहरप्रमुख मंदार केळकर, अनिल पवार, अशोक माने, आप्पा भंडारी, अशोक वडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

पोलिसांची भूमिका:
दापोली पोलिसांनी निवेदन स्वीकारले असून, या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.